उबदार क्षण
#उबदार_क्षण ..!!
_________________________________________
प्रसाद द. पोफळी, नागपूर
प्रसंग छोटेसेच … सहजच घडलेले … पण त्यातून काहीतरी सांगू पाहणारे ....
परवा 31 डिसेंबर .... इंग्रजी कालगणनेनुसार वर्षांचा शेवटचा दिवस … बाहेर कडाक्याची थंडी … हवामान खात्यानुसार 3 ते 4℃ … ऑफिस मधून जरा लवकरच घरी आलो. तशी संध्याकाळ झालीच होती. अंगणात तुळशीपाशी दिवा लागला होता. घरात आलो .. वडील दारं बंद करून अंगावर शाल गुंडाळून, डोक्याला लोकरीची टोपी घालून पण तरीही थंडीने थरथरत बसलेले .. आई देवाजवळ रामरक्षा म्हणत .. बायको रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीत .. मुलगा एकटाच कॉम्पुटर समोर बसलेला …
मनात आलं आज काही वेगळं करावं … जे नेहमी वर्षभर आपण केलं नाही ते … नव्हे जे वर्षानुवर्षे केलं नाही ते … झालं … आली लहर केला कहर … असं काम …,, जेव्हा आलं मनात तेव्हा ... जे मनात आलं ते … इतवारी लोहाओळीत गेलो … शेगडी घेतली … तिथेच किराणा ओळीत गेलो … सोनीच्या दुकानातून ज्वारी घेतली …महाल मातृसेवा संघा जवळ आलो … वखारीतून कोळसे घेतले … चक्की वर गेलो … ज्वारीचं पीठ दळलं … घरी आलो …शेगडी पेटवली … वांगे भाजले … पापड भाजले … आणि बायकोला पीठ भिजवायला सांगितलं ... भाकरी अन् भरीत तयार झालं …
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गारठवणाऱ्या थंडीत … एक वेगळा मेन्यू ...
• मेथीचा झुणका ...
• वांग्याचं भरीत …दही घालून
• वांग्याचं भरीत नुसतं फोडणीचं
• पालकाचं वरण …
• लाल मिरची चा ठेचा …
• लसणाची चटणी …
• गूळ आणि त्यावर ताजे साजूक तूप …
या सर्वांसोबत ...
गरमागरम ज्वारीची भाकरी ...
शरीरानं थकलेले अन् मनात मरगळ साठवलेले वडील, आई, बायको, मुलगा कुटुंबातील सर्वांसोबत जेवताना सर्वांचं मन अगदी तृप्त झालं होतं …नवीन वर्षाची सुरुवात एका छान तृप्ततेने व्हावी … या पेक्षा जास्त आणखी काय हवं नवीन वर्षाच्या सुरुवातीला ...
अशा तृप्ततेने ढेकर दिल्यावर आमच्या सौं.ना म्हटलं … "जर का एखादं वटसवित्रीसारखं व्रत असेल तर ते करून जन्मोजन्मी हीच बायको मिळो अशी ईश्वराजवळ प्रार्थना करीन म्हणतो …" कधी नव्हे ते बायकोचं तोंडभरून कौतुक केल्यावर बायकोच्या चेहऱ्यावर गेल्या 17 वर्षात न बघितलेलं लज्जा आणि कौतुकमिश्रित हसू उमटलं … तृप्तता होतीच, आता समाधानानं भरून पावलो …
शेगडी रसरसून पेटलेली होती, फुललेली होती … त्या शेगडीतील लालबुंद निखाऱ्यांच्या उष्णतेने वातावरण उबदार झालं होतं … शरीराला जाणवणारी ऊब त्या शेगडीच्या निखाऱ्यांची होती पण त्याचवेळी सर्वांच्याच मनाला जाणवणारी ऊब होती कौटुंबिक जिव्हाळ्याची…, वडीलधाऱ्या आज्जी-आजोबां बद्दलच्या नातवाच्या मनातील आपुलकीची … त्या वडीलधाऱ्या आईवडिलांच्या मनातील लेक-सून-नातू यांच्या विषयीच्या जिव्हाळ्याची … एका बापाच्या मनातील कुटुंबवत्सलतेची … तशीच एक सुन म्हणून, बायको म्हणून अन् आई म्हणून दिवसभर राबणाऱ्या गृहकर्तव्यदक्ष सुगरण गृहिणीच्या मनातील समाधानाची …
त्या दिवशीचा सकाळचा प्रसंग आठवला. सध्या हिवाळ्याच्या सकाळी सूर्य जरा उशिरानेच उगवतो. आईनं पूजेसाठी झाडावरची जास्वंदाची फुलं तोडायला सांगितली. फुलं तोडायला गेलो, बघितलं तर सकाळच्या गोठवणाऱ्या थंडीमुळे कळ्या अजून उमललेल्या नव्हत्या. आईला म्हटलं फुलं उमललेली नाहीत तर ती म्हणाली, "ठीक आहे असू दे, जरा वेळानं सूर्यप्रकाशाची ऊब मिळाली की फुलतील." खरंच… जास्वंदाची फुलं असोत नाही तर माणसं, पण उमलायला अन् फुलायला ऊब ही हवीच … अन् याच संदर्भात आठवले चार दिवसांपूर्वीचे ज्येष्ठ कविमित्र श्री. श्रीपाद कोठे यांचे काही शब्द …
`काय ही थंडी? ऊनही कोमट लागतं'
असं पुटपुटत त्याने खुडल्या
काही कळ्या जास्वंदाच्या …
अन उमलाव्या म्हणून परतल्या थोड्या
तवा किंचित गरम करून, त्यावर;
कळ्या फुलल्या नाहीतच …
काही कोमेजल्या, काही काळवंडल्या;
कळ्यांना हवी असते ऊब,
उमलण्यासाठी …
नसतो उपयोग उष्णतेचा;
ऊब वेगळी, उष्णता वेगळी …
हे वेगळेपण कळायला
मिळायला हवी ऊब;
कदाचित त्याला
मिळालीच नसेल...
आणि मग सर्वांचं जेवण आटोपल्यावर शेगडीवर हात शेकतांना समाधानाने ओथंबलेल्या, फुललेल्या या चेहऱ्यांचा कौटुंबिक उबदार वातावरणात एक फोटो काढला … अन् म्हटलं …
हॅपी न्यू इयर … नूतन वर्षाभिनंदन !!
😃😃😃
_________________________________________
© प्रसाद द. पोफळी, नागपूर | 9822569648
Comments
Post a Comment