चुन आणि चकली...
चुन आणि चकली...
______________________________________
प्रसाद द. पोफळी, नागपूर
प्रसंग छोटेसेच … सहजच घडलेले … पण त्यातून काहीतरी सांगू पाहणारे ....
'अरे वा ! आज "चुन" केलं दिसतंय !!'
उन्हाळ्यातील अशाच एका संध्याकाळी आसटसर खिचडी सोबत घट्ट बेसन भाकरीचा जेवणाचा बेत बघितल्यावर मी सहजच उद्गारलो. सांडगे, पापड, लोणचं, कांदा इत्यादी आवडणारे पदार्थ सोबत होतेच.
'बाबा, आता हे चुन काय वेगळं असतं ? बेसनच आहे ना !!', माझ्या "चुन" या शब्दाने चकित होऊन नेहमी संगणकीय भाषेच्या अभ्यासात गर्क असणारे आमचे "नर्म पेहरावी तंत्रज्ञ" चिरंजीव ( शुद्ध मराठीत सांगायचं तर सॉफ्ट वेअर इंजिनिअर ) बोलते झाले.
'असं सगळं सारखंच नसतं रे … आळण, बेसन आणि चुन सगळेच पदार्थ बेसनापासूनच तयार होतात. पण आळण जरा पाण्याचे प्रमाण जास्त असलेले, पातळसर वाटीत घेण्याजोगे ; बेसन त्याच्यापेक्षा जरा घट्ट, पाण्याचे प्रमाण आळणापेक्षा कमी असलेले, पण ताटात घेतल्यावर थोडेसे पसरणारे आणि चुन म्हणजे पाण्याचे प्रमाण बरेच कमी असलेले, घट्ट गोळ्यासारखे, वाढले तिथेच राहणारे…. त्याहीपेक्षा आणखी कोरडा असलेला बेसनाचा प्रकार म्हणजे झुणका ...' मी जेवता जेवता मुलाला समजावून सांगत होतो.
'अरे बापरे !! तुम्हाला स्वयंपाकातलं इतकं कळतं हे माहिती नव्हतं मला !!', सौ उद्गारल्या.
आमच्याकडून चिरंजीवांवर सुरू असलेले हे पाक संस्कार ऐकून स्वयंपाकघरासोबत अस्मादिकांच्या 'कायम शत्रुत्वा'बद्दल गेली दोन दशके 'अतूट विश्वास' बाळगून असलेल्या आमच्या 'पाकनिपुण' सहचारिणीच्या त्या विश्वासाला तडा गेला. आश्चर्य आणि संशय मिश्रित नजरेने त्या आमच्याकडे बघू लागल्या. 'आपल्या नवऱ्याला पाककलेतील काहीच येत नाही' असा आजवर असलेला आपला समज खरा का विष्णू मनोहरां सारखं इतक्या बारकाईने वर्णन करून प्रत्येक पदार्थातील फरक बरोब्बर सांगणारं हे रूप खरं ? इतक्या वर्षात आपल्या नवऱ्याच्या नाना कळा जोखण्यात आपण कमी पडलोय का ? अशी थोडी न्यूनगंडाची भावना तिच्या मनात घर करू लागली. २० वर्षे गुणिले १२ महिने ... बापरे म्हणजे २४० महिने .. इतके महिने प्रत्येक महिन्याच्या किमान एका रविवारी नवऱ्याच्या हातचं आयतं जेवण्याच्या संधीला आपण मुकलो तर नाही ना ? अशी एक चिंतातुर शलाका क्षणभरासाठी तिच्या डोक्यात चमकून गेली.
'पण शेवटी बेसन ते बेसनच ! चव तर सारखीच असणार ना !' आमचे चिरंजीव मात्र यातला फरक मानायला तयार नव्हते. त्याचा तर्क अगदीच नाकारता येण्यासारखा नव्हता पण तितकासा रुचतही नव्हता.
"अरे, चकली काटेरी असते, पण ती तशी न करता त्याच पिठाच्या जिलबी सारख्या वेटोळ्या घातल्या तर ... , तिच्यात तो खुसखुशीत पणा येईल का ? रव्या बेसनाचा लाडू ...आणि त्याच रव्या बेसनाच्या वड्या ... पण तुला लाडू आवडत नाही, वडी मात्र अतिप्रिय असं का बरं !! लाडू वेगळा आणि वड्या वेगळ्या ... असे का ... ??? फरक तर केवळ आकाराचाच ना ...मग का त्यांना वेगवेगळी नावं ठेवतो आपण ...", आता (बापापेक्षा सवाई असणाऱ्या) आपल्या खवय्या बेट्याला खाद्य संस्कृतीच्याच भाषेत समजावीत त्याची आई बोलली.
"हं ... बरोबर आहे. आता आलं लक्षात. मुख्य घटक एकच पण त्याचं इतर घटकां सोबतचं मिश्रण, त्याची तयार करण्याची पद्धत, त्याचा आकार, इत्यादी गोष्टी सुद्धा पदार्थाची चव ठरवत असतात. असंच ना !!"
सुरुवातीला बापाने पुरवलेल्या 'डेटा'वर आईच्या 'लॅंग्वेज' द्वारे "कोडींग डिकोडिंग प्रोसेस" पूर्ण झाल्यावर चिरंजीवांच्या 'प्रोसेसर' मधून लगेच आउटपुट आले आणि आपले सॉफ्टवेअर योग्य प्रकारे काम करतेयं याचे समाधान वाटले.
या निमित्ताने मी मात्र विचार करू लागलो. एक प्रजाती म्हणून मनुष्ययोनीत जन्मलेल्या सर्व व्यक्ती सारख्याच असल्या तरी शारीरिक ठेवण, रंग, रूप … बोलण्याची ढब, विचारांची बैठक या आपल्या विविध वैशिष्ट्यां मुळे आणि बारीकसारीक फरकां मुळे प्रत्येक व्यक्ती सुद्धा अशीच वैशिष्टयपूर्ण ठरत असते ना ! परिस्थितीसोबत जुळवून घेणे ; किंवा त्यावर प्रतिसाद, प्रतिकार अशी प्रतिक्रिया देत व्यक्त होणे … हे सारे व्यक्तिपरत्वे वेगवेगळेच !! मुळात असलेल्या वेगवेगळ्या स्वभावानुरूप तर ते ठरतेच, सोबतच वेळोवेळी झालेले संस्कार, जीवनातील सुखदुःखाच्या विविध घटनांना तोंड देताना येणारे वेगवेगळे अनुभव आणि अशाच कितीतरी लहान लहान गोष्टीच प्रत्येकाला वैशिष्टयपूर्ण करीत असतात ना !!
मग आपण हे वेगळेपण समजून न घेता प्रत्येक व्यक्तीची एकाच कसोटीवर पारख करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे का ??
"अहो, मी काय म्हणते, आता पुढच्या महिन्यात आमच्या महिला मंडळाची ट्रिप जाणार आहे. तेव्हा दोन दिवस स्वयंपाकाघराची जबाबदारी आता तुम्हालाच सांभाळायची आहे बरं !!" सौं च्या या आदेशाने माझी विचार शृंखला तुटली. आणि या एका चुन शब्दात मुळे भविष्यात येऊ घातलेल्या संकटाची चुणूक मला मिळाली.
- प्रसाद पोफळी
दि. २१/०२/२०२२
Comments
Post a Comment