सुखाचे डोही
सुखाचे डोही...
_____________________________________
• प्रसाद द. पोफळी, नागपूर
अशीच एक पावसाळी संध्याकाळ … नुकताच ऑफिस मधून आलेलो … दिवसभर बरीच धावपळ झालेली…, तीन चार नवीन क्लायंटकडे भेटी, चालू असलेली कामं डेडलाईनच्या आत पूर्ण व्हावी म्हणून साईट व्हिजिट्स इत्यादी आटोपून घरी यायला बराच उशीर झाला होता . एखादा दिवस असतोच असा की केवळ सकाळच्या घाईघाईत केलेल्या जेवणावर आणि दुपारी वेळातवेळ काढून घेतलेल्या चहावरच दिवस काढावा लागतो.
घर आल्या आल्या मस्त कोमट पाण्याने आंघोळ करून आल्यावर दिवाणावरील लोडाला पाठ टेकली. सकाळी व्यवस्थित जेवण झालं नसल्याने आता बायकोला छान गरम गरम पोळ्या करून वाढायला सांगावं असा विचार करीत असतांनाच स्वयंपाक घरातून गृहकर्तव्यदक्ष गृहिणी विचारत्या झाल्या ...
"अहो, आता तुमचं रात्रीचं जेवण कसं आहे ?"
आज सूर वेगळा होता. रागरंग कसा आहे याचा जरा अंदाज घ्यावा म्हणू फार न बोलता मी एक शब्दात विचारले ...
"म्हणजे ...??"
"नाही ... सकाळी घाई घाईत तुम्ही कमीच जेवलात. तुमचा मुलगा पण तुमच्या सारखाच … कॉलेज ला उशीर होतो म्हणून न जेवता गेला आणि डब्यातही मोजून दोनच पोळ्या घेऊन गेला. त्यामुळे सकाळच्या काही पोळ्या उरल्या आहेत. आता तुमचं दुपारी बाहेर काही सटरफटर खाणं झालं असेल, या पोराने कॅन्टीन मध्ये काहीबाही हादडलं असेल तर आता सकाळच्या पोळ्या वाढीन म्हणते. आता परत गरम पोळ्या केल्या तर सकाळच्या पोळ्या कुणीही खाणार नाही. सगळ्यांच्या जेवणाचा अंदाज घेऊनच गरम पोळ्या करणार आहे मी ..."
सकाळी लगबगीने उठून मुलाच्या, नवऱ्याच्या घाईने केलेल्या स्वयंपाकावर झालेल्या अन्यायाला अन्नपूर्णेच्या मुखातून वाचा फुटली.
सद्यस्थितीत असलेला सर्वपरिचित घरगुती ग्लोबल वॉर्मिंग चा धोका लक्षात आला. साधारणतः ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमशिखरं वितळतात आणि तिथून उगम पावणाऱ्या नद्यांना पूर येतो. इथे घरगुती ग्लोबल वॉर्मिंग मुळे मात्र माझे शिखर (मेंदू) गोठण्याच्या स्थितीत आले होते आणि नाराजीचा प्रवाह केव्हाही महापुराचे रौद्ररूप दाखवेल की काय अशी स्थिती उत्पन्न झाली होती. ही स्थिती निवळावी म्हणून मी म्हणालो,
"वा !! म्हणजे काय … जेवणार तर आहेच … भूक पण लागलीय ... गरम पोळ्या करच ... तुझ्या हातच्या गरमागरम टम्म फुगलेल्या मऊसूत पोळ्यांची सर त्या बाहेरच्या सटरफटर काहीबाही खाण्याला येणार आहे का ?आणि ज्याला भूक लागत नसेल त्यालाही भूक लागावी असा त्या पोळीवर साजूक तूप सोडल्यावर येणारा खरपूस गंध .. माझ्या तोंडाला तर कल्पनेनेच पाणी सुटलंय..!! पण वाढताना आधी सकाळी केलेल्या पोळ्या वाढ आणि नंतर गरम पोळ्या वाढ ..."
"का ... ??" सौं चा प्रतिप्रश्न …
हे ग्लोबल वॉर्मिंग इतके होते की राग वितळण्याचे लक्षण काही दिसत नव्हते.
"अगं कसं आहे, आनंद चढत्या क्रमाने मिळत गेला की माणूस सुखावतो, मनाला बरं वाटतं ... सुखाचा क्रम उतरता असेल तर मात्र दुःख होतं ..."
मी आपलं तत्वज्ञान पाजळलं.
"पण बाबा, मी काय म्हणतो...,"
आमचे चिरंजीव मध्ये कडमडले.
"या दुःखालाच सुखात रूपांतरित नाही का करता येणार ??"
ऑ ... !! ते कसं काय ??
चिरंजिवांच्या या गुगली ने मात्र मी पार गडबडलो होतो.
"या सकाळच्या पोळ्या, त्यांना जर तव्यावर थोडं तूप सोडून परतून त्याचे पराठे केले तर कसं राहील ??"
त्याचे हे स्पष्टीकरण ऐकून या नेहमी वेंधळेपणासाठी बोलणी खाणाऱ्या चिरंजिवांच्या प्रसंगावधानाचे मला कौतुक वाटले. आणि म्हणालो -
"अरे वा !! तू तर हा वेगळाच सकारात्मक दृष्टिकोन मांडलास !! नेहमी करता प्रत्येक गोष्टी कडे बघण्याची आपली दृष्टी ही अशीच ठेव ..!!"
आता या सुवर्णमध्य साधणाऱ्या आशेच्या किरणांनी बऱ्याच वेळापासूनच्या गोठलेल्या हिमशिखरावर सोन्याप्रमाणे झळाळी आली. आणि लगेच मायेने टम्म फुगलेली गरमागरम मऊसूत पोळी पानात पडली. काही वेळापूर्वी साचलेले नाराजीचे डबके आता सुखाच्या डोहात रुपांतरीत झाले होते.
(180812)
___________________________________
प्रसाद द. पोफळी | 9822569648
Comments
Post a Comment